राज्य शासन विविध स्तरातील नागरिकांसाठी व सर्वच क्षेत्रांसाठी विविध योजना राबवत असते. आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या राज्यभरातील लाभार्थ्यांसाठी 30 कोटी रूपयांचे अनुदान वितरणासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिल्याचे वृत्त आले आहे.
या अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यासाठी 92 लाख 37 हजार 600 रूपयांचा निधी आला आहे. त्याचप्रमाणे दुसरी योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी 64 लाख 6हजार 100 रूपयांचा समावेश आहे. असा एकंदरीत दीड कोटींचे अनुदान अहमदनगर जिल्ह्यासाठी आले आहे.
अहमदनगर जिल्ह्यात संजय गांधी निराधार आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे एकंदरीतच जिल्ह्यासाठी एकूण 1 कोटी 56 लाख 43 हजार 700 रूपयांचा निधी मिळणार आहे. या लाभार्थ्यांमध्ये आता या निधीमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
संजय गांधी निराधार योजनेचा लाभ कुणाला मिळतो – शासनाने सुरु केलेल्या संजय गांधी निराधार योजनेमध्ये अनेकांना लाभ मिळतो. यामध्ये पुढील लाभार्थ्यांना दिलासा मिळतो. 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा आदी लाभार्थ्यांना याचा लाभ मिळतो.
जर तुम्हाला या योजनेमध्ये लाभ घ्यायचं असेल तर दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा 21 हजार रुपयांपर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.