कोरोनामुळे तीन वर्षांपासून होऊ न शकलेले जिल्हा परिषदेचे साईज्योती बचतगटांचे प्रदर्शन यंदा १० ते १४ फेब्रुवारी दरम्यान येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मैदानावर होत आहे. यंदा यात कृषी महोत्सव व पशू प्रदर्शन यांचाही समावेश करण्यात आला आहे, स्टॉलची संख्या ७७० असणार आहे. १०फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन होईल.
यंदा या प्रदर्शनात उमेद अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री, तसेच खाद्यपदार्थाच्या विक्रीसाठी एकूण 3०० स्टॉल, कृषी विभागांतर्गत धान्य, फळे, कृषी औजारे व कृषी निविष्ठा यांच्या प्रदर्शनासाठी २२० स्टॉल, पशुधन, पशु-पक्षी, विविध जातींची चारापिके यांच्या प्रदर्शनासाठी २० स्टॉल, तसेच शासकीय विभागासाठी 30 स्टॉल असे एकूण ४७० स्टॉल लावण्यात येणार आहेत.
बारा कोटींचा रेडा ठरणार आकर्षण
या प्रदर्शनात विविध पशु-पक्ष्यांचाही सहभाग असेल. जगातील सर्वाधिक उंचीचा व तीन वेळा राष्ट्रीय चॅम्पियन ठरलेला हरियाणातील मुरा जातीचा बारा कोटी रुपये किमतीचा दारा नावाचा रेडा प्रदर्शनाचे आकर्षण ठरणार आहे.६ फूट उंच व ११०० किलो वजनाचा हा रेडा हरियाणामधून विशेष ट्र्कने पोहोचणार आहे
प्रदर्शनात असतील…
मेहसाना, पंढरपुरी, सुरती या जातीच्या म्हशी, गीर, डांगी, साहिवाल, खिलार या देशी गायी, तसेच जर्सी, होलस्टीन फ्रिजियन या विदेशी गायींचा समावेश असेल. त्याचबरोबर
शेळ्या, मेंढ्या, घोडे, वराह, श्वान, लव्ह बर्डस, टर्फी,फाऊल, फायटर कॉक, डक व विविध जातींच्या कोंबड्या प्रदर्शनात असतील.
पार्किंगची व्यवस्था –
न्यू आटर्सच्या मैदानावर सर्व स्टॉल असतील, तर पार्किंगची व्यवस्था समोर असलेल्या पोलीस परेड मैदानावर करण्यात आली आहे.
प्रदर्शन वेळ – सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत खुले असेल.
भोजनाची व्यवस्था –
प्रदर्शन खर्चासाठी सुमारे ६० लाखांची तरतूद करण्यात आलेली आहे. यात प्रदर्शनात सहभागी महिलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे.