रिलायन्स रिटेलच्या एका निर्णयामुळे जिओ मार्ट ग्राहकांना धक्का बसला आहे. जिओ मार्टने आपली लोकप्रिय असणारी वितरण सेवा ‘एक्सप्रेस’ बंद करण्याची घोषणा केली आहे. जिओ मार्टच्या माध्यमातून वस्तूंची डिलिव्हरी लवकर घेण्याची सवय लागलेल्या ग्राहकांसाठी हा मोठा धक्का आहे. रिलायन्स रिटेलने कोणतीही घोषणा न करता आपली फास्ट डिलिव्हरी सेवा बंद केली आहे.
एका रिपोर्टनुसार, या घटनेची माहिती असलेल्या लोकांनी ही बातमी दिली आहे. जिओ मार्टची सेवा गेल्या वर्षी मार्चमध्ये सुरू करण्यात आली होती. जिओमार्टच्या सर्व्हिस एक्सप्रेसच्या माध्यमातून लोकांना केवळ ९० मिनिटांत वस्तूंची डिलिव्हरी मिळत होती.
जिओ मार्टच्या क्विक डिलिव्हरी सर्व्हिसच्या ग्राहकांना आता गुगल प्ले स्टोअरवरून जिओ मार्ट एक्सप्रेस अँप डाऊनलोड करता येणार नाही आणि त्याची वेबसाइटही सक्रिय नाही. त्याऐवजी त्यांनी ग्राहकांसाठी जिओमार्ट व्हॉट्सअँप सेवा सुरू केली आहे. जिओ मार्ट च्या व्हॉट्सअँप सेवेमुळे ग्राहकांना काही तासांत वस्तूंची डिलिव्हरी मिळू शकते.
ही सेवा जिओ मार्ट एक्स्प्रेसच्या सेवेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. व्हॉट्सअँपच्या माध्यमातून जिओ मार्टची डिलिव्हरी सेवा ही मेटा इंक आणि रिलायन्स जिओ प्लॅटफॉर्म ची भागीदारी आहे. जिओ मार्ट एक्सप्रेस सर्वप्रथम नवी मुंबई आणि आसपासच्या भागात सुरू करण्यात आली होती आणि 200 शहरांमध्ये त्याचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.