Top-10 Billionaires List : गौतम अदानी-हिंडेनबर्ग प्रकरण उघडकीस आल्यापासून जगातील टॉप अब्जाधीशांची यादी दिवसेंदिवस बदलत आहे. गौतम अदानी टॉप-२० मधून बाहेर पडले आहेत. परंतु हे जरी एकीकडे खरे असले तरी आपले भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी सुसाट निघालेले आहेत. अंबानी यांनी पुन्हा एकदा मोठी झेप घेतली असून श्रीमंतांच्या यादीत ते १२ व्या क्रमांकावरून थेट नवव्या क्रमांकावर पोहोचले आहेत.
अंबानींचा पुन्हा टॉप-10 मध्ये : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांची फोर्ब्सच्या पहिल्या १० अब्जाधीशांच्या यादीत १२ व्या स्थानावर घसरण झाली होती. पण गेल्या २४ तासात त्यांच्या कंपनीच्या शेअर्सच्या (रिलायन्स शेअर्स) किमतीत वाढ झाल्याने त्यांना ३.५ अब्ज डॉलर म्हणजेच जवळपास २८ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे.
फोर्ब्सच्या रिअल टाइम बिलियनर्स इंडेक्सनुसार मुकेश अंबानी यांची संपत्ती ८५.४ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे आणि या आकडेवारीसह ते पुन्हा जगातील नववे सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. भारतीय अब्जाधीश गौतम अदानी यांना हिंडेनबर्ग च्या अहवालामुळे तोटा सहन करावा लागत आहे. २४ जानेवारी २०२३ रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अदानी यांच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण होत असून त्यांचे अनेक शेअर्स दररोज लोअर सर्किटमध्ये जाताना दिसत आहेत.
हिंडेनबर्ग अहवालाचा अदानी समूहाच्या मार्केट कॅपवर मोठा परिणाम झाला. ते २० दिवसांत ते निम्म्यावर आले . गौतम अदानी यांच्याकडे सध्या ५२.२ अब्ज डॉलरची संपत्ती असून ते या यादीत २४ व्या स्थानावर आहेत. गेल्या २४ तासांत अदानींचे १७.३९ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. बुधवारी दुपारी २.४० वाजेपर्यंत अदानी समूहातील चार कंपन्यांचे समभाग लोअर सर्किटमध्ये होते.
बर्नार्ड अर्नाल्ट २१५.९ अब्ज डॉलरसह पहिल्या, एलन मस्क १९६.५ अब्ज डॉलरसह दुसऱ्या आणि जेफ बेझोस १२२.९ अब्ज डॉलरसह तिसऱ्या स्थानावर श्रीमंतांच्या यादीत आहेत. या यादीत लॅरी एलिसन ११४.३ अब्ज डॉलरसह चौथ्या, वॉरेन बफे १०८.४ अब्ज डॉलरसह पाचव्या, बिल गेट्स १०६.७ अब्ज डॉलरसह सहाव्या, कार्लोस स्लिम हेलू ८९.१ अब्ज डॉलरसह सातव्या, ८६.५ अब्ज डॉलरसह आठव्या स्थानावर स्टीव्ह बाल्मर आहेत.