Pune Google Office Bomb Threat News: गुगलच्या पुण्यातील ऑफिस मध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी मिळाल्याने खळबळ उडाली आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी, मुंबई) येथील गुगल च्या कार्यालयात धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार मिळाल्यानंतर त्यांनी गुगलच्या पुणे कार्यालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी देणारा फोन करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटल्यानंतर त्याला पकडून चौकशी सुरू केली आहे.
धमकीचा फोन हैदराबाद येथून करण्यात आला होता.
हैदराबादयेथील पानायम शिवानंद असे या व्यक्तीचे नाव असून त्याने गुगलच्या मुंबईतील कार्यालयात फोन करून कंपनीच्या पुणे कार्यालयात बॉम्ब ठेवण्याची धमकी दिली होती. मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीची चौकशी केली असता त्याने फोन करताना दारू प्यायल्याचे समोर आले आहे. गुगल ऑफिसच्या तक्रारीवरून शिवानंद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी पोलिस माहिती आणि पुरावे गोळा करत आहेत.
रात्री उशिरा पुण्यातील गुगल कार्यालयात पोहोचले पोलिसांचे तपास पथक
पोलिस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील मुंढवा परिसरातील एका बहुमजली व्यावसायिक इमारतीच्या अकराव्या मजल्यावरील कार्यालयपरिसरात रविवारी रात्री उशिरा बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत अलर्ट जारी केला आहे.