Chia Farming : सध्याच्या शेती व्यवसायात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी नवनवीन प्रयोग सुरू आहेत. यंदाच्या रब्बी हंगामात पीक पद्धतीत झालेल्या बदलांमध्येही त्याचे प्रतिबिंब उमटले आहे. अमेरिकेतील मेक्सिको राज्यात पिकणाऱ्या ‘चिया’ची लागवड आता अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकाळी तालुक्यातील मोरळ, भेंडी गाजी, बैरखेड अन् पिंजर येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
चार शेतकरी मित्रांनी ‘चिया’ची लागवड करण्यासाठी युट्युबचा आधार घेतला आहे. त्यांनी इतरांपेक्षा काहीतरी वेगळं तर केलंच, पण हा प्रयोग यशस्वीही केला. दिल्ली, राजस्थान आणि इतर बाजारपेठांमध्ये या चिया बियाण्यांना मोठी मागणी असून त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करूनच हे पीक घेण्याचा निर्णय घेतला आहे.
चार शेतकरी मित्रांचा प्रयोग
अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील मोरल, भेंडी गाझी, बैरखेड , पिंजर या विविध गावांतील चार शेतकरी एकत्र आले. गजानन लक्ष्मणराव मार्गे, रवी मानतकर पाटील, ओम प्रकाश वानखेडे पाटील, उदय पाटील हे चार शेतकरी आहेत. हे चौघेही मूळ शेतकरी असून पारंपरिक पद्धतीने पिके घेतात. मात्र बदलत्या वातावरणामुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. अनेकदा पावसाचा प्रश्न असतो. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
यूट्यूबवरुन शिकले
शेताशेजारी वनक्षेत्र असल्याने पिकांना वन्यप्राण्यांचा त्रास होतो. त्यामुळे या संकटावर मात करण्यासाठी पारंपरिक शेतीला ब्रेक देत नव्या पिकांकडे वळण्याचा विचार केला. शेतकरी उदय ठाकरे यांनी ‘चिया’ शेतीसंदर्भात युट्युब आणि गुगलवरून माहिती गोळा केली. गजानन, रवी आणि ओम प्रकाश यांच्याशीही त्यांनी संवाद साधला. यासंदर्भात अधिक माहितीसाठी मध्य प्रदेशातील चिया लागवड क्षेत्राला भेट देऊन शेतीच्या सर्व पद्धती समजून घेतल्या.
मिळाला हजारोंचा भाव
गजानन मार्गे यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये म्हणजे रब्बी हंगामात चियाची लागवड केली. आज चिया शीड फुलोराला आहे आणि बियाणे भरण्यावर आहेत. येत्या वीस दिवसांत हे पीक पूर्णपणे तयार होईल, असेही गजानन सांगतात. दोन एकरात प्रत्येकी चार ते पाच क्विंटलपेक्षा अधिक उत्पादन अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर चिया बियाण्यांची मागणीही चांगली असून प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत दर मिळू शकतो. यामुळे शेतकऱ्यांना नवे पर्याय उपलब्ध झाले आहेत.
वन्यजीवांचा धोका नाही आणि कमी खर्चही आहे
चिया बियाणे लागवडीचा खर्च अतिशय कमी आहे. २ एकर क्षेत्रासाठी बी-सीडिंग खर्च २५०० रुपये आहे. पेरणीचा खर्च सुमारे दोन हजार रुपये येतो, एकत्रित खर्च सुमारे पाच ते सहा हजार रुपये येतो. शेतीतून नफा मिळतो. या चिया शेतीवर कीडीचा प्रादुर्भाव होत नसून वन्यप्राणी देखील या शेतात फिरकत नाहीत.
चियामधील औषधी गुणधर्म
यामध्ये दुधापेक्षा जास्त कॅल्शियम असते. रक्तदाब, मधुमेह यांसारख्या आजारांवर औषध म्हणून याचा वापर केला जात आहे. याला चिया बियाण्यांना मोठी मागणी आहे. बाराही महिन्यासाठी या बियाण्यांना मागणी असून भावही चांगला आहे. गजानन सांगतात की, कमी खर्चात जास्त कमाई करणे हा शेतीसाठी चांगला पर्याय आहे.