माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी हे क्रीडा विश्वातील नाव कुणाला माहीत नाही असे शोधून सापडणार नाही. परंतु खेळापेक्षा इतर गोष्टींनी विनोद कांबळी चर्चेत राहिला. आजही विनोद कांबळी पुन्हा चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्यानं त्याच्या पत्नीस मारहाण केली.
आजपर्यंत विनोद कांबळी यावर अनेक आरोप झाले. त्याला अटक देखील करण्यात आली होती. जुलै 2018 मध्ये विनोद कांबळी आणि त्याच्या पत्नीविरोधात एका व्यक्तीनं मारहाणीचा आरोप केला होता. राजेंद्र कुमार तिवारी यांनी याबाबत गुन्हा नोंदवला होता.
मुंबईतल्या एका मॉलमध्ये राजेंद्र कुमार यांचा कांबळीच्या पत्नीला चुकून हात लागला, त्या कारणास्तव कांबळीनं त्यांना मारहाण केली असे म्हटले गेले होते. त्यांच्या मुलानं असं सांगितलं की, रविवार असल्यानं मॉलमध्ये वर्दळ होती. माझे वडील माझ्या मुलीला गेमिंग झोनकडून फूड कोर्ट घेऊन चालले होते. माझ्या वडिलांनाही कांबळीच्या पत्नीला स्पर्श झाला ते कळालं नव्हतं. असा असतानाही त्यांना मारहाण केली असेही ते म्हणाले होते.
मार्च 2022 मध्ये विनोद कांबळी याने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवताना एका कारला धडक दिल्या प्रकरणी कारमालकाने पोलीस तक्रार दिली होती. सदर प्रकरणी बांद्रा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर लगेचच जामिनावर सुटका करण्यात आली.
मध्यंतरी त्याच्या मोलकरणीने देखील विनोद कांबळी आणि त्याची पत्नी अँड्रिया हेविट या दोघांवर आरोप केले होते. पैसे मागितले म्हणून तीन दिवस घराच्या खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप केला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेऊन तपास सुरू केला होता.
आणि आता आज हे पत्नीस मारहाणीचे प्रकरण समोर आले आहे. त्याच्या पत्नीने मुंबईतील वांद्रे पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर शिवीगाळ आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे. विनोद कांबळीने फ्लॅटमध्ये मद्यधुंद अवस्थेत तिला मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे पत्नीचे म्हणणे आहे.
कांबळीने स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल तिच्यावर फेकले, त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कांबळी चर्चेत आला आहे.