शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्य चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. सध्याच्या सत्तासंघर्षात एकनाथ शिंदे आणि त्यांचा गट भक्कम झाला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा याचिकेत ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. याचदरम्यान राज्यात सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षावर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा परिणाम होणार नाही. उलट सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा परिणाम निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर होऊ शकतो. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाची मला अपेक्षा नव्हती. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येईपर्यंत निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असे माझे मत होते. पण सर्वोच्च न्यायालयाने त्याविरोधात निकाल दिला तर निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय रद्द होईल असं मत उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे.
या आठवड्याच्या अखेरीस सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सद्यस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणाऱ्या शिवसैनिकांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे आनंदाचे, जल्लोषाचे आणि टीकेचे बाण या लोकांना आणखी सतावतील. खरी कसोटी आता शिंदे शिवसेनेच्या नेत्यांची आहे.