पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयावर आयकर विभागाने छापा टाकला आहे. प्राथमिक माहितीनुसार, आयकर विभागाने पुण्यात एकूण सहा ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात अनिरुद्ध देशपांडे यांच्या कार्यालयाचाही समावेश आहे.
आता यामधून काय होणार हे पाहावे लागेल. अनिरुद्ध देशपांडे हे शरद पवार यांच्या निकटवर्तीय वर्तुळात असल्याने प्राप्तिकर विभागाच्या कारवाईकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. आयकर विभागाने आज पुण्यात छापे टाकले आहेत.
प्राप्तिकर विभागाने काही कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत.
आर्थिक गैरव्यवहाराच्या संशयावरून प्राप्तिकर विभागाने छापे टाकले. देशपांडे यांची सिटी कॉर्पोरेशन लिमिटेड ही बांधकाम कंपनी आहे. डेक्कन जिमखाना परिसरातील फर्ग्युसन रोडवर कंपनीचे कार्यालय असून हडपसर परिसरातील अमनोरा पार्क परिसरात कंपनीचे कार्यालय आहे. देशपांडे यांचे कार्यालय आणि निवासस्थानातून काही कागदपत्रे जप्त करण्यात आली असून दिल्ली आणि मुंबईतील प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक या कारवाईत सहभागी झाले होते.
महाराष्ट्रात सध्या अनेक ठिकाणी धाडी पडत आहेत. अनेक ठिकाणी चौकशी सुरु आहेत. या धाडसत्रामुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.