नुकतेच जवाहर नवोदय परीक्षेकरिता प्रत्येक विद्यालयाने पाचवीतील 100% विद्यार्थी परीक्षेला बसलेच पाहिजे अशी सक्ती केली आहे. हेच विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला बसलेले आहेत. तसेच पाचवीचा नियमित अभ्यासक्रमाचा ही तान मुलांवरती आहे. इतक्या कमी वयातील चिमुकल्या मुलांवरती तीन परीक्षेचा भार टाकून शासनाने विद्यार्थी, पालक व शिक्षक यांच्यावरील ताण वाढवलेला आहे.
मागील दोन वर्ष कोरोनामुळे तिसरी चौथीतील विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाही . यामुळे या मुलांना प्राथमिक पाया (अध्ययन स्तर) वाढविण्यासाठी शिक्षकांचे प्रयत्न चालू आहेत. अशा विद्यार्थ्यांना पाचवी मध्ये शिष्यवृत्ती, नवोदय सारख्या परीक्षेची सक्ती करणे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची भीती निर्माण होऊन त्यांच्या मेंदू वरती अतिरिक्ततान वाढेल व त्याचा परिणाम आरोग्यावर होणार आहे. नवोदय किंवा शिष्यवृत्ती परीक्षा यापैकी एक परीक्षा चौथी किंवा सहावी वर्गासाठी असावी अशी मागणी शिक्षक व पालक यांच्या मधून होत आहे. शासनाला गुणवत्ता वाढ हवी आहे. शिक्षकांकडून तशी अपेक्षा आहे.
परंतु दररोज अतिरिक्त कामे, रोज पाच ते दहा जीआर व त्यांची माहिती देणे, यामुळे शिक्षक मेटाकुटीला आलेला आहे. मग गुणवत्ता वाढ होणार कशी? याकरता आता पालकांनीच उठाव केला पाहिजे शिक्षकांनी फक्त गुणवत्तेतच काम केले पाहिजे. अन्यथा संपूर्ण पिढ्या बरबाद झाल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. याची सर्वस्वी जबाबदारी घेणार कोण ही पण विचारना होत आहे.