पुण्यात रंगलेल्या ६५ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यंदाची मानाची गदा शिवराज राक्षेने पटकावली. अंतिम सामन्यात शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला काही मिनिटात चीतपट केलं. अंतिम सामन्यातील दोन्ही मल्ल हे पुण्यातच सराव करत होते. वस्ताद काका पवार आणि गोविंद पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात दोघांनी कुस्तीचे धडे गिरवले होते.
महाराष्ट्रात मिशन ऑलिम्पिक सुरू करणार : देवेंद्र फडणवीस
फडणवीसांना विनंती आहे की महाराष्ट्राचं सरकारने मिशन ऑलिम्पिकच्या नावाने राज्यातील खेळाडूंना मदत करावी. महाराष्ट्राचा ऑलिम्पिक मेडलचा दुष्काळ संपावा असं ब्रीजभूषण सिंह म्हणाले होते. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण महाराष्ट्रात मिशन ऑलिम्पिक सुरू करणार असल्याची घोषणा केली.
हर्षवर्धन सदगीरचा पराभव, शिवराज राक्षे फायनलमध्ये
मॅटवरील कुस्तीत शिवराज राक्षे आणि माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांच्यात लढत सुरू झालीय. यात सुरुवातीपासूनच शिवराज राक्षेने आक्रमक खेळ करत ६-० अशा फरकाने आघाडी घेतली. त्यानंतर हर्षवर्धनने एक गुण मिळवला पण शिवराज राक्षेने आणखी दोन गुण मिळवले. यात शिवराज राक्षेने ८-१ अशा गुण फरकाने विजय मिळवला.
सिंकदर शेख पराभूत, महेंद्र गायकवाड फायनलमध्ये
महेंद्र गायकवाड आणि सिकंदर शेख यांच्यात कुस्तीला सुरुवात. तीन मिनिटाच्या पहिल्या फेरीत दोघेही आक्रमक खेळले. दरम्यान, कुस्ती करून गुण मिळवण्यासाठी दोघांनाही वॉर्निंग दिली होती. महेंद्र गायकवाडला एक तर सिकंदर शेखला पहिल्या फेरीत दोन गुण मिळाले. अखेरीस महेंद्र गायकवाडने ५ तर सिकंदर शेखने ४ गुण मिळवले. गुणांच्या फरकाने सिकंदर शेखवर महेंद्र गायकवाडने विजय मिळवला.
महाराष्ट्र केसरी विजेत्याला मिळणार थार
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्याला महिंद्रा थार जीप आणि पाच लाखांचे रोख बक्षीस मिळणार आहे. उपविजेत्याला ट्रॅक्टर आणि रोख अडीच लाखांचे बक्षीस मिळणार आहे.
महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीसाठी राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. गेल्या वर्षी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केल्यानं ते चर्चेत आले होते. राज ठाकरेंना भेटणार का असं विचारले असता त्यांनी म्हटलं की, जर ते मंचावर आले तर नक्की भेटू, त्यांच्याशी वैयक्तिक शत्रूत्व नाही.”