देशातील पहिली एसी डबलडेकर बस आता मुंबईच्या रस्त्यांवर धावणार आहे. या बसला पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाकडून (एआरएआय) फिटनेस प्रमाणपत्र मिळाले आहे. स्विच नावाच्या कंपनीने ही बस विकसित केली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये ही बस आली होती. मात्र, ही बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्यापूर्वी एआरएआयची मान्यता घेणे आवश्यक होते.
रविवारी सायंकाळी ही बस मुंबईला पोहोचली. आठवडाभरात ही बस सुरू होईल. हैदराबादच्या स्विच कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही बस २०२२ मध्ये तयार झाली होती, परंतु एआरएआयने त्याला मान्यता दिली नव्हती. त्याला आता मंजुरी देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लवकरच १० बसेस मुंबईला पाठविण्यात येणार आहेत.
बसची कार्यक्षमता १८० किमी असणे अपेक्षित आहे. त्यासाठी रस्त्यांचा दर्जा, रहदारी आणि हवामान अशा अनेक बाबींचा विचार केला जातो. ४५ मिनिटांच्या चार्जिंगमध्ये ही बस १०० किमी धावू शकते, तर फुल चार्ज होण्यासाठी ८० मिनिटे लागतात. या बसची ऍल्युमिनिअम पासून बनवलेली बॉडी आहे. या बसची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे. यात सुमारे ८० प्रवासी प्रवास करू शकतात.
२०० बसेस ची भर पडणार
अशोक लेलँडच्या स्विच कंपनीला बेस्टकडून २०० एसी डबलडेकर बसतयार करण्याची ऑर्डर मिळाली आहे. कंपनी एक ते दीड वर्षात ऑर्डर पूर्ण करेल. सध्या बेस्टकडे डिझेलवर चालणाऱ्या ४५ जुन्या डबलडेकर बसेस जून २०२३ पर्यंत सर्विसबाहेर होणार आहेत. जून २०२३ पर्यंत या सर्व ४५ बस काढून नवीन इलेक्ट्रिक डबल डेकर बस चालविण्यात येतील.
बेस्टची योजना काय आहे?
बेस्टकडे सध्या ३,६०० बसेस आहेत. या वर्षाच्या अखेरीस सात हजारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या बेस्टकडे १३६ महिला बसेस असून त्या वाढवून ५०० करण्यात येणार आहेत. २०२६ पर्यंत बेस्टच्या सर्व इलेक्ट्रिक बसेस असतील. या इलेक्ट्रिक बसमुळे शहरातील प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
यासाठी किती भाडं असेल ?
वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गावर बेस्टची ही सेवा धावणार आहे. ही बस सुरुवातीला कुर्ला ते सांताक्रूझ दरम्यान धावणार आहे. या वातानुकूलित बसचे किमान भाडे ५ किमीसाठी ६ रुपये असेल. बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असतील. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहक यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था, बसच्या दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे असतील.