मुंबईत आतापर्यंतचे सर्वात महागडे लक्झरी फ्लॅट विकले गेले आहेत. वरळीतील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवरमधील 23 फ्लॅट 1200 कोटी रुपयांना विकण्यात आले आहेत. डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमाणी यांचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र आणि जवळच्या सहकाऱ्यांनी डॉ. एनी बेजंट रोडवरील थ्री सिक्स्टी वेस्टच्या टॉवर बी मध्ये हे शानदार अपार्टमेंट खरेदी केले आहेत.
हे फ्लॅट सुहाना बिल्डर्सने विकले आहेत. यातील प्रत्येक फ्लॅट 5000 चौरस फुटांचा आहे. या फ्लॅटची किंमत प्रत्येकी 50 ते 60 कोटी रुपये आहे. या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे की, हे फ्लॅट सवलतीसह विकले गेले. पाच महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. अखेर शुक्रवारी या करारावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर डीमार्टचे संस्थापक राधाकृष्ण दमानी यांनी आपले कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि जवळच्या व्यक्तींसाठी 23 फ्लॅट खरेदी केले. त्यांची किंमत सुमारे 1200 कोटी रुपये आहे.
थ्री सिक्स्टी वेस्टमधील काही मोठे अपार्टमेंट यापूर्वी सुमारे 75 ते 80 कोटी रुपयांना विकले गेले होते. गेल्या वर्षी आयजीई (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडने या प्रकल्पातील दोन सदनिका सुमारे 151 कोटी रुपयांना खरेदी केल्या होत्या. राधाकृष्ण दमानी आणि त्यांच्या भावाने दक्षिण मुंबईतील नारायण दाभोलकर रोडयेथे 1,001 कोटी रुपयांना बंगला खरेदी केला होता. मलबार हिलमध्ये दीड एकर जागेवर हा बंगला आहे. तसेच 2021 च्या अखेरीस अलिबागजवळील एका गावात सहा एकर बीचफ्रंटचे घर सुमारे 80 कोटी रुपयांना विकत घेण्यात आले होते.