ठाणे : भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा मुंबईत बांधण्यात येणार आहे. मुंबई – अहमदाबाद हायस्पीड बुलेट ट्रेन यातून प्रवास करणार आहे. समुद्राखालच्या सात किलोमीटरसह एकूण २१ किलोमीटरच्या बोगद्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून ९ फेब्रुवारीपासून त्या अधिकाऱ्यांना प्राप्त होतील. प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण होण्यासाठी आणखी किमान तीन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
वांद्रे-कुर्ला संकुल ते शिळफाटा स्थानकादरम्यान ठाणे खाडीवर हा बोगदा उभारण्यात येणार आहे. बीकेसी ते शिळफाटा हे अंतर सुमारे ३५ किमी आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर बोगदा पूर्ण होण्यास सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागणार आहे.
प्रस्तावित हायस्पीड बुलेट ट्रेन कॉरिडॉर मुंबईतील ठाणे खाडीतून जाणार आहे. हा परिसर फ्लेमिंगो आणि जवळच असलेल्या खारफुटीसाठी संरक्षित अभयारण्य आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक एका बोगद्याद्वारे समुद्राखालून तयार केले जातील. बुलेट ट्रेन प्रकल्प हाताळणाऱ्या नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या यंत्रणेत कोणतीही अडचण येणार नसल्याचे म्हटले आहे.
हा बोगदा भारतातील सर्वात लांब रेल्वे वाहतूकदार आणि समुद्राखालील पहिला बोगदा असेल. ही १३.२ मीटर रुंदीची सिंगल ट्यूब असेल. आवश्यकतेनुसार नवीन ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड (एनएटीएम) आणि टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) या दोन्हीद्वारे बांधकाम केले जाईल. प्राधिकरणाने यापूर्वीच या प्रकल्पासाठी पाण्याखाली सर्वेक्षण केले आहे.
महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रकल्प हा ५०८.१७ किमी लांबीचा कॉरिडॉर आहे. मुंबई आणि अहमदाबाद ही दोन शहरे १२ स्थानकांद्वारे जोडली जाणार आहेत. यामध्ये मुंबई बीकेसी, ठाणे शिळफाटा, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आनंद/नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती ही बारा स्थानके आहेत . या प्रकल्पाचा अंदाजित खर्च १.१ लाख कोटी रुपये आहे. प्रकल्पाचा पहिला टप्पा २०२६ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सध्याच्या आराखड्यानुसार या मार्गावरील ट्रेन ताशी ३२० किमी वेगाने धावणार आहेत. पीक अवर्समध्ये दर २० मिनिटांनी आणि नॉन पीक अवर्समध्ये ३० मिनिटांनी गाड्या धावतील. दररोज ३५ गाड्या सोडण्यात येणार आहेत. हे संपूर्ण अंतर पार करण्यासाठी सुमारे एक तास ५८ मिनिटे लागतील. सध्या हे अंतर पार करण्यासाठी किमान आठ तासांचा वेळ लागतो.