पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया एनर्जी वीक (आयईडब्ल्यू) 2023 मध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रित पेट्रोल लाँच केले. गेल्या काही वर्षांपासून मोदी सरकार इथेनॉलचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आज या दिशेने पावले टाकली आहेत. पहिल्या टप्प्यात पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल (ई-20) वापरले जात आहे.
देशातील विविध शहरांमध्ये 20 टक्के इथेनॉलवर आधारित इंधन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात 15 महत्त्वाच्या शहरांमध्ये इथेनॉल मिश्रित पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात येत्या दोन वर्षांत इतर शहरांमध्ये इथेनॉल इंधन उपलब्ध होणार आहे. 11 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 84 पेट्रोल पंपांवर ई-20 पेट्रोल उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
E-20 हे परिष्कृत आणि मिश्र इंधन आहे. हे इंधन पेट्रोल आणि इथेनॉल एकत्र करून तयार केले जाते. आतापर्यंत 10 टक्के इथेनॉलचा वापर केला जात होता. त्यात आता वाढ करण्यात आली आहे. यामुळे पेट्रोल स्वस्त होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर ई-20 लाँच करण्यात आले आहे. या प्रकल्पाला 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ई-२० प्रोग्रॅमचा सर्वाधिक फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. अतिरिक्त उत्पन्न म्हणून याकडे पाहिले जात आहे. गेल्या आठ वर्षांत इथेनॉल पुरवठादारांनी ८१ हजार ७९६ कोटी रुपये, तर शेतकऱ्यांनी ४९ हजार ७८ कोटी रुपये कमावले आहेत. देशाच्या परकीय चलन खर्चात ५३ हजार ८९४ कोटी रुपयांची बचत झाली आहे. तसेच कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन ३१८ लाख टनांनी कमी केले आहे.