सध्या केस पांढरे होणे ही समस्या अनेकांना भेडसावत आहे. ऐन तारुण्यात किंवा अगदी लहान वयातच अनेकांचे केस पांढरे होऊ लागले आहेत. अयोग्य आहार शैली, ताणतणाव, उच्च रक्तदाब, झोप न लागणे, अनुवांशिक घटक आदी कारणे केस पांढरे होण्यास कारणीभूत आहेत.
अमेरिकेतील काही त्वचा तज्ज्ञांच्या मते, जेव्हा रंगद्रव्य तयार करणाऱ्या पेशी रंगद्रव्ये बनवणे बंद करतात, तेव्हा केस पांढरे होऊ लागतात. याशिवाय नैसर्गिक हायड्रोजन पेरॉक्साइड देखील केसांमध्ये जमा होऊ लागते, ज्यामुळे केस पांढरे होतात. सामान्यतः आशियाई देशांमध्ये वयाच्या ३० नंतर लोकांचे केस पांढरे होतात, परंतु आजकाल ही समस्या लहान मुलांनाही सतावू लागली आहे. दरम्यान यावर काही घरगुती उपायांनी नियंत्रण मिळवले जाऊ शकते.
चला जाणून घेऊयात याबद्दल –
आवळा
आवळा हा केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आवळा आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये वापरला जातो. व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आवळ्याचे सेवन केल्याने केस पांढरे होण्यापासून बचाव होतो. आवळा सेवन केल्याने केस लवकर पांढरे होत नाहीत. केस अकाली पांढरे होऊ नयेत यासाठी आवळा पावडर, आवळा तेल, आवळ्याचा रस वापरू शकता.
कांदा
एका रिपोर्टनुसार केसांवर कांद्याचा वापर केल्याने केसांना खूप फायदा होतो. कांद्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात. या गुणधर्म मुळे केस मजबूत आणि घट्ट होतात.
कांद्याचा रस केसांवर लावल्याने केसगळती दूर होण्यास मदत होते आणि रक्ताभिसरण सुधारते. केस काळे करण्यासाठी कांद्याचा रस खूप गुणकारी आहे. पांढरे केस नैसर्गिकरित्या काळे करण्यासाठी 2 चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात 2 चमचे लिंबाचा रस घाला. हा रस चांगला मिसळा आणि अर्धा तास केसांना लावा. हा रस आठवड्यातून एकदा केसांवर लावल्याने केसांचा पांढरापणा दूर होईल.