Pune Ahmednagar Aurangabad Expressway : सध्या महामार्गांचे जाळे चांगलेच पसरत आहे. त्यामुळे दळणवळण आणि व्यापार दोन्ही वृद्धिंगत होत आहे. दरम्यान आता पुणे-अहमदनगर-औरंगाबाद हा महामार्ग महाराष्ट्रातील निर्माणाधीन प्रमुख महामार्गांपैकी एक आहे.
हा भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या माध्यमातून बांधला जाणार असून त्याची लांबी 225 किमी आहे. दरम्यान हा महामार्ग औरंगाबाद, नगर आणि पुणे जिल्ह्यातील गावांसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.
कशा पद्धतीची आहे या महामार्गाचे स्वरूप?
पुणे औरंगाबाद द्रुतगती महामार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार असून या महामार्गामुळे औरंगाबाद ते पुणे प्रवासाचा वेळ पाच तासांवरून दोन तासांवर येणार आहे. या महामार्गासाठी दहा हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित असून त्याची लांबी 225 किमी आहे. हा सहा पदरी महामार्ग असून त्याची रुंदी 70 मीटर असेल.
पुण्याच्या रिंगरोडपासून औरंगाबादच्या शेंद्रा एमआयडीसीपर्यंत समृद्धी महामार्गापर्यंत हा मार्ग जोडला जाईल.
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठणमधील 17 आणि औरंगाबाद तालुक्यातील 24 गावांमधून हा महामार्ग जाणार असून, त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.