चिंचवड : चिंचवड येथील दळवीनगर चेकपोस्टवरून निवडणूक विभागाच्या तपास पथकाने ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिंचवड परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
चारचाकी वाहनांची तपासणी करताना ही कारवाई करण्यात आली. चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या आचारसंहिता आहे. निवडणूक आयोगाचे तपास पथक शहरात ठिकठिकाणी चेकपोस्ट करत आहे. पोलिसांना एका कारमध्ये ४३ लाखांची रक्कम सापडली आहे.
मतदारांना प्रलोभणासाठी हे पैसे घेतले जात होते का? याबाबत चौकशी सुरू आहे. तपासणीदरम्यान चिंचवड येथील एका चेकपोस्टवर सकाळी साडेदहा च्या सुमारास ४३ लाख रुपयांची रोकड असलेली चारचाकी गाडी आढळून आली. एवढी मोठी रक्कम कोण आणि कुठे जात होती, याचा तपास निवडणूक आयोगाचे तपास पथक करत आहे.
संबंधित ड्रायव्हर व्यावसायिक असून माझ्या मेडिकल व्यवसायाची ही रक्कम भरण्यासाठी बँकेत जात असल्याचे ड्रायव्हरने सांगितले. मात्र, पुढील चौकशी करूनच कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्चाची मर्यादा ४० लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ही मर्यादा २८ लाख रुपये होती.