Nashik Pune Railway : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेला रविवारी (ता. ५) केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे.
सविस्तर प्रकल्प अहवालातील तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश श्री. वैष्णव यांनी दिले असून, प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे ठेवला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Devendra Fadnavis statement Nashik Pune semi high speed railway will be built In principle approval of Union Railway Minister proposal come before Cabinet Nashik News)
श्री. फडणवीस म्हणाले, की नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी केंद्र सरकारसमवेत २०१७-१८ मध्ये करार झाला होता. त्यानुसार प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर करण्यात आला होता.
यापूर्वी श्री. वैष्णव यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत त्यात सुधारणा सूचवण्यात आल्या होत्या. त्या सुधारणा करून सविस्तर प्रकल्प अहवाल श्री. वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सादर करण्यात आला. बैठकीसाठी रेल्वेचे अधिकारी, महाराष्ट्र रेल्वे पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जैस्वाल, अर्थ सचिव मनोज सौनिक, पायाभूत सुविधा प्रकल्प वॉररूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार आदी उपस्थित होते.
बैठकीमध्ये आराखड्यात आणखी त्रुटी असल्याचे पुढे आले. त्यांची पूर्तता करून केंद्रीय मंत्रिमंडळासाठी प्रस्ताव केला जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता मिळाल्यावर निविदा काढण्यात येतील.
नवीन आर्थिक मार्ग होईल
नाशिक आणि पुणे या शहरांमध्ये वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सेमी हायस्पीड रेल्वेमुळे वाहतुकीवरील ताण कमी होत असताना नवीन आर्थिक मार्ग तयार होईल, असेही श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नाशिक व पुणे शहरांची आर्थिक वाढ झपाट्याने होत असताना माल वाहतुकीमध्ये मोठी वाढ झाली आहे. हा रेल्वेमार्ग नाशिक, नगर, पुणे या तीन प्रमुख जिल्ह्यातून जाईल. विद्युतीकरणासह दोन्ही लाइन एकावेळी बांधण्याचे प्रस्तावित आहे.
आळंदी, चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, सिन्नर, सातपूर या पुणे आणि नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रासाठी अखंड ‘कनेक्टिव्हिटी‘ उपलब्ध होणार आहे. रेल्वे कॉरिडॉरच्या बाजूने कंटेनर डेपोचा विकास केला जाईल. खासगी फ्रेट टर्मिनल, ड्रायपोर्ट, मल्टिमॉडल आणि कमर्शिअल हब, स्थानिक उद्योगांनी सूचवलेल्या ठिकाणी वेअर हाऊस व साइडिंगचा विकास केला जाईल. औष्णीक वीज प्रकल्पांना कोळश्याच्या वाहतुकीसाठी कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे.
सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या ‘हायलाइट्स’
० लांबी : २३५.१५ किलोमीटर
० गती संभाव्यता : ताशी २०० किलोमीटरसह अर्ध उच्च गती
० नाशिक ते पुणे प्रवासाची वेळ : २ तास
० प्रस्तावित स्थानके : २४
० बोगदे : १८
० प्रकल्पाची किंमत : अंदाजे १६ हजार ३९ कोटी
० पूर्ण होण्याचा कालावधी : बाराशे दिवस
“महाराष्ट्रातील नाशिक आणि पुणे ही दोन्ही शहरे संस्कृती व आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची आहेत. या दोन्ही शहरांना रेल्वेची ‘कनेक्टिव्हिटी’ देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न केला आहे. त्यांना मी धन्यवाद देतो.”
– अश्विनी वैष्णव (केंद्रीय रेल्वेमंत्री)