पुणे : पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट आणि वाकडेवाडी एसटी स्थानक परिसरात प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याचे नियोजन परिवहन पोलिसांनी केले आहे. वाहतूक विभाग (आरटीओ) आणि रेल्वे प्रशासनसोबत वाहतूक पोलिस समन्वय साधत आहे. काही रिक्षा संघटनांशीही चर्चा केली आहे. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी होणारी प्रवाशांची लूट थांबणार आहे.
शहरातील रेल्वे स्थानक आणि एसटी स्थानक परिसरात रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अडविले जाते. जवळचे भाडे नाकारणे, मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे, प्रवाशांसोबत अरेरावी करणे अशा तक्रारी आहेत. रिक्षाचालकांविरोधात तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया किचकट असल्याने नागरिक तक्रार करीत नाहीत परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरात ‘ओला’ आणि ‘उबर’सारख्या प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
१० ते १५ दिवसांत सुरू होणार सेवा
रेल्वे प्रशासनाने परिवहन पोलिस उपायुक्त विजय मगर यांच्याशी चर्चा करून पुणे स्थानकातून प्रीपेड ऑटो सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. पुणे रेल्वे स्थानक आणि गर्दीच्या ठिकाणी प्रीपेड रिक्षा सुरू करण्याची मागणी प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे माजी सदस्य बाबा शिंदे व अन्य सदस्यांनी वाहतूक पोलिस उपायुक्तांची भेट घेऊन केली होती.
त्यानुसार प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हिरवा कंदील दाखविला आहे. येत्या १०-१५ दिवसांत तीन ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.