एटीएम मशिनवर पैसे काढण्यासाठी गेल्यावर एटीएम कार्ड टाकून चलनी नोट बाहेर काढली जाते. पण आता एटीएममधून केवळ चलनी नोटाच नाही तर नाणीही बाहेर पडणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या एमपीसीच्या तीन दिवसीय बैठकीनंतर गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सलग सहाव्यांदा रेपो दरात वाढ करण्याची घोषणा केली आणि क्यूआर-आधारित कॉइन वेंडिंग मशीन्सचा पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची घोषणा केली.
यूपीआयच्या माध्यमातून काढली जाणार नाणी
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास म्हणाले की, केंद्रीय बँक क्यूआर-आधारित वेंडिंग मशीनचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. नाण्यांची उपलब्धता वाढविणे हा त्याचा उद्देश आहे. ते म्हणाले की, रिझर्व्ह बँक सुरुवातीच्या टप्प्यात देशातील 12 शहरांमध्ये ते सुरू करणार आहे. या क्यूआर कोड बेस्ड वेंडिंग मशिनचा वापर यूपीआयच्या माध्यमातून केला जाणार असून नोटांऐवजी नाणी काढली जाणार आहेत. मात्र, या पथदर्शी प्रकल्पासाठी कोणत्या १२ शहरांची निवड करण्यात आली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
बँक खात्यातून पैसे कापले जातील
या कॉइन वेंडिंग मशिन्समुळे कोणताही ग्राहक आपल्या यूपीआय अॅपद्वारे मशीनच्या वरचा क्यूआर कोड स्कॅन करून नाणी काढू शकणार आहे. ग्राहक जेवढी नाणी काढतो, तेवढी नाणी त्याच्या नोंदणीकृत बँक खात्यातून काढली जातील. अत्यंत सोप्या प्रक्रियेत ज्याप्रमाणे तुम्ही एटीएममध्ये जाऊन आपल्या डेबिट कार्डद्वारे नोट काढू शकता, त्याचप्रमाणे या मशीनमधून क्यूआर कोड स्कॅन करून नाणी काढू शकाल. १२ शहरांमध्ये सुरू होणाऱ्या या पथदर्शी प्रकल्पाच्या यशाच्या आधारे त्याचा विस्तार करण्यात येणार आहे.
Repo Rate मध्ये .25% टक्क्यांनी वाढ
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांनी रेपो दरात वाढ करण्याच्या निर्णयाने देशातील सर्वसामान्य जनतेला धक्का दिला असतानाच, अशा नव्या घोषणांपासून दिलासा देण्याचे कामही त्यांनी केले आहे. एमपीसीमध्ये झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती देताना शक्तिकांत दास म्हणाले की, आता परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी यूपीआयच्या सुविधेचा विचार केला जात आहे. या वर्षाच्या पहिल्याच बैठकीत रिझर्व्ह बँकेने पॉलिसी रेट किंवा रेपो रेटमध्ये .25 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर रेपो रेट वाढून 6.50 टक्के झाला आहे.