Sidhu Moose Wala Pune Connection: प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची कधी दिवसांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील दोन आरोपी हे पुण्याचे असल्याची माहिती समोर आली आहे.
आरोपी संतोष जाधव, सौरव महाकाल या दोघांचं पुण्याशी संबंध असल्याचं समोर आलं आहे. मुसेवाला यांच्या हत्या प्रकरणात 8 लोकांची छायाचित्रं प्रकाशित करण्यात आली होती. यापैकी एका आरोपीला देहरादूनमधून पकडण्यात आलं आहे. तर संतोष आणि सौरव हे दोघं पुण्यातील असल्याची माहिती आहे.
संतोष जाधवचं नाव पुणे मंचरमधील गुन्हेगार ओंकार उर्फ़ राण्या बाणखेलेच्या हत्या प्रकरणात समोर आलं होतं. ओंकारच्या हत्या प्रकरणात संतोष जाधव सध्या फरार आहे. पुणे क्राइम ब्रांच संतोष जाधव चा शोध घेत आहे. संतोष जाधवनं ‘सूर्य उगवताच तुला संपवून टाकीन’ असं स्टेटस टाकलं होतं. यावर ओंकारनं लिहिलं होतं की, ‘कुणीही येऊ द्या, संतोषला भेटणार आणि ठोकणार’. यानंतर शूटरनं बाईकवरुन येत ओंकार बाणखेले ची एक ऑगस्ट रोजी दिवसाढवळ्या हत्या केली होती. तेव्हापासून संतोष फरार आहे. आता त्याचं नाव सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणात देखील समोर आलं आहे.