पुणे – पुणे-नाशिकसाठी सेमी स्पीड ट्रेन सुरू होणार आहे. यामुळे पावणेदोन तासात नाशिकवरून पुणे आणि पुण्याहून थेट नाशिकला पोहोचणे शक्य होणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकतीच नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली.
पण या बाबतीत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. हा अडथळा दूर करणे महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनसमोर (एमएसआरटीसी) आव्हान असणार आहे. पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, अशी माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ही समस्या लवकरच सुटणार आहे.
अडथळा काय आहे?
पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला केंद्राची तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. पण पुण्यातील नारायणगावजवळील जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) ३० हा या प्रकल्पातील मोठा अडथळा आहे. ट्रेन लाईन टेलीस्कोपच्या अँटेनाजवळून जाते.
यामुळे जीएमआरटीच्या वैज्ञानिकांच्या कामकाजात अडचण निर्माण होणार आहे. जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप पुणे शहरापासून ८० किमी अंतरावर आहे. हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी निवडलेला मार्ग नारायणगावमार्गे जातो आणि केंद्राच्या अँटेनापासून १५ किमी अंतरावर आहे. काही आतील भागाच्या अगदी जवळ आहेत.
रेल्वे मार्ग एका अँटेनापासून एक किलोमीटरपेक्षा ही कमी अंतरावर आहे. ही टेलिस्कोप १५०-१४२० हर्ट्झवर चालते. यात प्रत्येकी ४५ मीटर व्यासाचे ३० अँटेना आहेत. ते टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चच्या नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स द्वारे चालवले जातात.
काय असेल धोका
सेमी-हाय स्पीड रेल्वेमध्ये पॅंटोग्राफ असतात. पेंटोग्राफ हे रेल्वेमध्ये वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे उपकरण आहे. पेंटोग्राफ उच्च क्षमतेच्या रेल्वे तारांना स्पर्श करून विद्युत प्रवाह तयार करतो. यामुळे आगीच्या ठिणग्या बाहेर येतात आणि रेडिएशन बाहेर येते. त्याचा परिणाम दुर्बिणीवर होणार आहे.
अनेक वर्षांपासून पाठपुरावा
देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नानंतर रेल्वे मंत्रालयाने हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. सेमी स्पीड रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या १४५० हेक्टरपैकी ३० हेक्टरहून अधिक खासगी जमीन संपादित करण्यात आली आहे. महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने ही माहिती दिली. या प्रकल्पासाठी शासकीय व वनजमीन संपादित करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.