अलिबागच्या पांढऱ्या कांद्याचे पीक तयार झाले असून विविध बाजारात विक्रीसाठी जाऊ लागले आहे. कांदा माळ तयार करून बाजारात नेण्यासाठी शेतकरी मेहनत घेत आहेत. जानेवारी महिन्याच्या अखेरीस अलिबागचा पांढरा कांदा बाजारात येऊ लागला. पुण्यातील बाजारपेठेत आतापर्यंत सुमारे तीन लाख रुपये किमतीचा कांदा पाठविण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तालुक्यातील कार्ले, खंडाळे, वडगाव, नेहुली, सागाव, तळवली, पोवळे, राऊळे येथे पांढऱ्या कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. हा कांदा चवदार आणि औषधी गुणधर्मअसल्याने स्थानिकांसह पर्यटकांकडूनही मोठ्या प्रमाणात मागणी असते. कांदा काढण्यापासून ते कांदा तयार करण्यापर्यंत अनेक कामे स्थानिकांकडून केली जात असल्याने अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. जिल्ह्यात ३०० हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड केली जाते.
त्यापैकी अलिबाग तालुक्यात २५० हेक्टरवर कांद्याची लागवड केली जाते आणि दरवर्षी सुमारे २० लाखांची उलाढाल होते. गेल्या वर्षी अवकाळी पावसामुळे कांदा १५ दिवस उशिराने बाजारात दाखल झाला होता. मात्र यंदा अनुकूल वातावरणामुळे कांदा पीक लवकर तयार झाले आहे. गेल्या महिनाभरापासून कांदा काढण्यापासून माळा विणण्याचे काम वेगाने सुरू आहे. औषधी गुणधर्मामुळे अलिबाग कांद्याला विविध बाजारातून मागणी वाढत आहे. सुरुवातीला कांद्याची माळ २५० रुपयांना विकली जात होती. मात्र, सध्या तो 200 रुपयांना विकला जात आहे. काही व्यापारी अलिबागमध्ये येऊन कांदा खरेदी करत आहेत.