एकीकडे महाराष्ट्रात राजकीय संकट आलेले असताना शेजारील कर्नाटकमधील भाजपा मंत्र्याने मोठी खळबळ उडविणारे वक्तव्य केले आहे. नरेंद्र मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात एकूण ५० राज्ये निर्माण करणार असल्याचे या मंत्र्याने म्हटले आहे. यावर भाजपाच्याच मुख्यमंत्र्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.
सीमाभागातील कर्नाटकचे आमदार आणि मंत्री उमेश कत्ती यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. बार काऊन्सिलच्या बैठकीत त्यांनी हा दावा केला आहे. वेगळ्या उत्तर कर्नाटकसाठी आपल्याला लढा द्यावा लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे. मोदी २०२४ च्या निवडणुकीनंतर देशात ५० नवी राज्ये निर्माण करणार आहेत. महाराष्ट्र तीन भागांत विभागला जाईल, तर कर्नाटक दोन भागांत विभागला जाईल, असे ते म्हणाले.
यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी कत्ती यांचा राज्यांचे विभाजन करण्याचा दावा फेटाळून लावला आहे. सरकार अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आणण्याची योजना तयार करत नसल्याचे ते म्हणाले. कत्ती यांनी आधीही अशाप्रकारची विधाने केली आहेत. आता त्यांनी स्वत:च या प्रश्नावर उत्तर द्यायला हवे, असेही बोम्मई म्हणाले.
उमेश कत्ती हे कर्नाटकचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आहेत. त्यांच्याकडे ग्राहक व्यवहार आणि वन मंत्री पदही आहे. एवढ्या बड्या मंत्र्याने हे वक्तव्य केल्याने खळबळ उडाली आहे. पुढील लोकसभा निवडणुकीनंतर देशात ५० हून अधिक राज्ये निर्माण होतील, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. संपूर्ण कर्नाटकात पसरलेल्या लोकसंख्येच्या आधारावर उत्तर कर्नाटकही वेगळे राज्य होणार हे निश्चित. 2024 च्या निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: नवीन राज्यांची स्थापना करतील. महाराष्ट्र तीन, कर्नाटक दोन आणि उत्तर प्रदेश चार राज्ये होतील, असे कट्टी म्हणाले. इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे.