तुमच्यासारखे गुंड भरपूर आहेत, पण शरद पवार (Sharad Pawar) एकच आहेत, जगातील वरिष्ठ नेते आणि तुम्हा सगळ्यांचा बाप आहेत, असा इशाराच रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी नारायण राणेंना दिला
मुंबई :नारायण राणे (Narayan Rane) यांच्यासारख्या केंद्रीय मंत्र्याने शरद पवार साहेबांना पोकळ धमक्या देऊ नयेत, तुम्ही आम्हाला घर गाठणं कठीण करताय, की आम्ही तुमचं घराबाहेर पडणं बंद करतो, हे बघा, असा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिला. तुम्ही बेडकासारखे आलात कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं, अशा शब्दात पाटलांनी राणेंचा समाचार घेतला
रुपाली पाटील काय म्हणाल्या?
नारायण राणे यांनी शरद पवारांना धमकी दिली, त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही. बंडखोरांची मदत करायला आलेले नारायण राणे हे तुम्ही रचलेलं तर कुभांड आहे. तुमच्यावर ईडीची कारवाई होऊ नये, म्हणून तुम्ही स्वतः भाजपमध्ये गेलात आणि आता धुतल्या तांदळासारखे असल्याप्रमाणे बोलताय. ज्या सत्तापिपासू लोकांना ही सत्ता मिळवायची आहे, मी पुन्हा येईनचे झटके त्यांना येतात. त्यांनी महाराष्ट्रात हे रचून आणलंय, असा आरोप रुपाली पाटील यांनी केला.
आम्ही आमच्या आमदारांशी काय बोलायचं हा आमचा प्रश्न आहे. यात राणे बेडकासारखे आले कुठून, त्या बेडकाने कडेकडेने निघायचं. गल्लीगल्लीत असलेल्या गुंडांचा कसा बंदोबस्त करायचा हे महाविकास आघाडीला चांगलंच माहीत आहे. आम्ही आमचं घर गाठू की नाही, ते करुन दाखवा. परिस्थिती गंभीर असली तरी सरकार आणि शरद पवार खंबीर आहेत. त्यामुळे राणेंसारख्या केंद्रीय मंत्र्यांनी पोकळ धमक्या देऊ नये. आणि ही त्यांची भूमिका आहे की पक्षाची आहे, ते एकदा सांगावं. मग आमचंही रक्त हिंदुत्वाचं, छत्रपती शिवरायांच्या मावळ्याचं आहे. आम्ही तुमचं घराबाहेर येणं बंद करतोय, हे पाहा. तुमच्यासारखे गुंड भरपूर आहेत, पण शरद पवार एकच आहेत, जगातील वरिष्ठ नेते आणि तुम्हा सगळ्यांचा बाप आहेत, असा इशाराच रुपाली पाटील यांनी दिला.
नारायण राणे काय म्हणाले होते?
संजय राऊत (Sanjay Raut) तुमचे (शिवसेना) किती आमदार राहिलेत? मतदानाची अपेक्षा करू नका, पराभवाची करा. आघाडी सरकार हे सोयीसाठी व स्वार्थासाठी तयार झालेले सरकार आहे, त्यामुळे कामाच्या व कार्याच्या बढाया मारू नयेत. काहीजणांनी अनेक वेळा बंडखोरी केली. त्या बंडखोरीचा इतिहास उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. नको त्या क्षणी नको त्या वयात मान्यवरांना धमक्या देणे शोभत नाही, अशी धमकी राणेंनी पवारांना दिली होती.